• No products in the cart.

व्यवस्थापनेतील तत्वांचे स्वरूप व महत्त्व

 

“कल्पना सत्यात उतरविण्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा”

          एखाद्या व्यवसायाचे ध्येय प्राप्त करताना, विविध यंत्रणा आणि तंत्रांचा उपयोग करणे महत्वाचे असते, व्यवस्थापनेतील तत्वांचे स्वरूप व त्यातील काही छोट्या मोठ्या तंत्रांना वैश्विक मान्यता प्राप्त असल्याकारणाने त्या तंत्राना “तत्वे” असे संबोधले जाते. ही तत्वे व्यवस्थापकाला व्यवसायाची सर्व कार्य विशिष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी मार्गदर्शक ठरतात त्यामुळे व्यवस्थापकाला प्रभावी निर्णय घेण्यास मदत होते व व्यवसायचे  ध्येय साध्य होते.

            “तत्व हे एक मूलभूत सत्य किंवा प्रस्ताव म्हणून परिभाषित केले जाते जे विश्वास, वर्तनप्रणाली किंवा तर्कशुद्ध विचारांचा आधार घेऊन काम करत असते.” सोप्या भाषेत जी तंत्रे किंवा प्रणाली एकाच पद्धतीचे परिणाम देतात त्यांना तत्वे असे संबोधले जाते. ही तत्वे वैश्विक आहेत आणि ती सर्वत्र व्यवसायात लागू पडतात. या तत्वांच्या आधारामुळे व्यवस्थापकांना “चुका व शिका” या तत्वाचा अवलंब करावा लागत नाही. व्यवसायाची रचना व विभाजन विविध कामगार वर्गाच्या कौशल्यानुसार आणि क्षमेतनुसार  करण्यात येते. त्यालाच व्यवस्थपनेच्या भाषेत “कामाचे विभाजन” असे संबोधले जाते.जे व्यवस्थापनाच्या तत्वांपैकी आहे.

 

व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप –

            कर्मचाऱ्यांच्या कार्यावर प्रभावी नियंत्रण आणि  त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यवस्थापनाची तत्वे तयार केली जातात. ही तत्वे व्यापाराची कार्यक्षमता नफ्याच्या स्वरूपात वाढवतात तसेच ही तत्वे वरिष्ठ-कनिष्ठ कर्मचारी आणि व्यवसायाच्या सदस्यांमध्ये उत्कृष्ट समन्वय स्थापन करण्यात भर देतात. काही व्यवस्थापन तत्वांचे स्वरूप खालीलप्रमाणे-

१. सार्वत्रिक उपयोग –

            व्यवस्थापनाची तत्वे सार्वत्रिक आहेत म्हणजेच ही तत्वे कोणत्याही आकाराच्या व स्वरूपाच्या व्यवसायांना व संघटनांना लागू पडतात. तसेच त्यांच्या परिणामात बदल होऊ शकतो त्यामुळे त्यांच्या उपयोजनतही बदल करणे शक्य असते. तरीही ती सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी सोयीस्कर असतात. तसेच ही तत्वे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांवर लागू पडतात. उदाहरणार्थ- कर (TAX SYSTEM) प्रणालीतील बदल.   

२) मार्गदर्शक तत्वे –

            व्यवसायातील समस्या सोडवण्यासाठी तसेच एखादी संघटनात्मक परिस्थिती काळजीपूर्वक हाताळण्यासाठी व्यवस्थापनाची तत्वे मार्गदर्शक ठरतात.मार्गदर्शनाची तत्वे ही  लवचिक असतात.व्यवसायात कोणत्या तत्वांचा उपयोग करायचा हे त्यातील परिस्थिती, आकार व स्वरूपावर अवलंबून असते. सोप्या भाषेत जेव्हा आपण “योग्य मोबदला” असे म्हणतो तेव्हा “योग्य” हा शब्द त्या व्यवसायाच्या स्वरूप, आकार आर्थिक स्थितीनुसार बदलू शकतो.

३) सराव आणि प्रयोगाद्वारे तत्वे-

            विविध संशोधनातून तसेच नवनवीन प्रयोग करून हळूहळू व्यवस्थापन तत्वे विकसित केली जातात. ती विकसित करण्यापूर्वी पद्धतशीरपणे त्यावर निरीक्षणे आणि प्रयोग केली जातात. त्या प्रयोगांचे निष्कर्ष व्यवसायात किंवा व्यापारात वापरून पाहिल्यानंतरच त्यांचे तत्वांमध्ये रूपांतर केले जाते.

४) लवचिकता –

           व्यवस्थापनाची तत्वे लवचिक असतात. ही तत्वे परिस्थितीनुसार बदलता किंवा सुधारता येतात. ही तत्वे अवलंबताना  व्यवस्थापक व्यवसायाच्या गरजेनुसार बदल करतो.व्यवसायाची परिस्थिती सतत बदलत असते. आपल्या व्यवसायाच्या गरजेप्रमाणे ही तत्वे सुधारून अथवा त्यात बदल करून ती वापरली जातात.

५. कर्मचाऱ्यांच्या कार्यावर प्रभावी नियंत्रण –

      व्यवस्थापन ही सामुहिक कृती आहे. व्यक्तींच्या सामूहिक प्रयत्नातून विशिष्ट उद्दिष्ट साध्य करणे हे व्यवस्थापनाचे ध्येय असते, कामगार व व्यवस्थापनातील विविध कर्मचाऱ्यांच्या कार्यावर प्रभावी नियंत्रण राखण्यासाठी ही तत्वे तयार केली जातात. ही तत्वे कर्मचाऱ्यांच्या कार्यावर समूहावर नियंत्रण ठेवून त्यांना ध्येयप्राप्तीसाठी दिशा दाखवतात.

६) कार्यकरण तत्वे –

    व्यवस्थापनाची तत्वे निर्णय घेण्यासाठी आधार आहेत. ती एखाद्या परिणामामागचे कारण निश्चित करते.चांगला पगार दिल्याने कामगारांची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते तसेच प्रभावी जाहिरातीने वस्तूंची विक्री वाढते.

               सर्व तत्वांना एकसारखे महत्त्व असते. पूर्ण नियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ही सर्व तत्वे एकच वेळी वापरणे आवश्यक आहे. एखादे तत्व विशेष लक्ष देवून वापरले आणि इतर तत्वांकडे दुर्लक्ष झाले तर त्याचा परिणाम व्यवसायाच्या कामकाजावर होतो.व्यवसायच्या गरजेनुसार ही  तत्वे बदलुन अथवा सुधारुन वापरली जातात

 व्यवस्थापन तत्वांचे महत्व :-

              ही तत्वे व्यवस्थापकांना मार्गदर्शन करतात म्हणून व्यवस्थापकांना त्याची माहिती असणे आवश्यक असते. सर्व प्रकारच्या व्यवसायिक संघटना व व्यवसाय कार्यामध्ये संघटनेचे असलेले स्वरुप , आकार व आवश्यकतेनुसार या तत्वांचा वापर केला जातो. त्यामुळे या तत्वांचे महत्त्व अभ्यासणे आवश्यक आहे.

१. व्यवस्थापकांमध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करणे –

      व्यवस्थापकांना संघटना समजण्यास व्यवस्थापनाच्या तत्वांची मदत होते. या तत्वांच्या अभ्यासामुळे परिस्थिती आणि समस्यांचे आकलन वाढविण्यास मदत होते. त्याचबरोबर समस्यांचे   निराकारण करण्यास आणि परिस्थिती हाताळण्यास व्यवस्थापकास मदत होते. ही तत्वे विविध व्यवसायिक लोकांच्या अनुभवाचा परिणाम आहे. भिन्न परिस्थिती व्यवसायात कश्या पद्धतीने हाताळावी हे समजण्यास या तत्वांचा उपयोग होतो.

२. व्यवसायात संसाधनाचा प्रभावी वापर करणे

         प्रत्येक व्यवसायात, दोन प्रकारची संसाधने वापरली जातात. एक भौतिक संसाधने ज्यात साहित्य, यंत्रसामग्री व पैसा  इत्यादीचा वापर केला जातो तर दुसरा मानवी संसाधने म्हणजेच (मनुष्यबळ)याचा वापर केला जातो. या संसाधनांचा पर्याप्त वापर करुन त्यांच्या अपव्ययावर नियंत्रण ठेवून व्यवसायामध्ये योग्य संतुलन ठेवणे हे व्यवस्थापनांचे मुलभुत कार्य आहे. व्यवस्थापन तत्वांचा आणि तंत्राचा वापर करून व्यवस्थापन कामकाजात शिस्त राहते आणि निरोगी वातावरण निर्माण होते. यामुळे व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण होतात त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते आणि आपल्या व्यवसायचे प्रशासन प्रभावी होते.

३) व्यवसायातील निर्णय –

    तत्वे एखादी परिस्थिती कुशलतेने हातळण्यास मदत करतात म्हणून अडचणी असल्यास त्याचा उपयोग होतो तत्वे नसल्यास व्यवस्थापकाला अडचणी आल्यावर सतत “चुका आणि शिका” या पद्धतीचा वापर करणे बंधनकारक झाले असते.

४) समन्वय व नियंत्रण –

     व्यवस्थापनाची तत्वे योग्य समन्वय साधण्यास व नियंत्रण करण्यास मार्गदर्शक ठरतात. वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय व सहकार्याची भावना निर्माण करणे सध्याच्या काळात खुप आव्हानात्मक झाले आहे, व्यवस्थापकांसाठी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर नियंत्रण ठेवणे खूप अवघड काम असते. योग्य समन्वय आणि नियंत्रण व्यवसाय वृद्धी गुरुकिल्ली आहे योग्य समन्वय कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण ठेवून उच्च उद्दिष्ट प्राप्त करण्यास कार्यक्षम आणि प्रभावी मार्गदर्शक तत्व आहे.

५) वस्तुनिष्ठ भूमिका –

       व्यवस्थापनाच्या विविध तत्वांच्या आधारे वस्तुनिष्ठ दृष्टिकोन विकसित करता आला पाहिजे.व्यवस्थापकाला व्यवसायाच्या संधी ओळखता आल्या पाहिजे तसेच समस्येचे मूळ कारण शोधुन त्यावर योग्य ती उपयोजनाही त्यावेळी करता आली पाहिजे. यामुळे व्यवस्थापकाच्या मनात आत्मविश्वास निर्माण होत असतो.

– मधुरा जोशी.

“व्यावसायिक ज्ञानाचा पाया भक्कम करा आणि स्वतःचा विकास घडवा.”


Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971

March 26, 2021

0 responses on "व्यवस्थापनेतील तत्वांचे स्वरूप व महत्त्व"

Leave a Message

All Right Reserved.