Custard Apple Processing Business

सीताफळाच्या गरापासून पावडर, जॅम, पेय, सिरप, मिल्कशेक, रबडी, आइस्क्रिम, श्रीखंड हे पदार्थ तयार करता येतात. सीताफळाच्या पदार्थांना स्थानिक तसेच परदेशी बाजारपेठांत चांगली मागणी आहे. त्यामुळे गावपातळीवरील बचत गटांमार्फत बाजारपेठेतील मागणीनुसार विविध पदार्थ तयार करणे शक्‍य आहे. 

गर काढून साठविणे

 • पिकलेल्या निरोगी सीताफळांचे दोन भाग करावेत. गर अलगदपणे चमच्याने काढून बिया वेगळ्या कराव्यात.
 • गर मिक्सरमध्ये बारीक करून स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात घ्यावा. त्यामध्ये ५०० पीपीएम ऍस्कॉर्बिक आम्ल व ७०० पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाईट मिसळून गरम करावा.
 • निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये किंवा पाऊचमध्ये भरून गर हवाबंद करावा. परत पाश्‍चराइज करून, थंड करून, लेबल लावून, थंड ठिकाणी (शीतगृहात) साठवून ठेवाव्यात.
 • साठवण कालावधीमध्ये गर काळा पडण्याची शक्‍यता असते. म्हणून तो थंड तापमानाला ठेवावा.
 • या पद्धतीशिवाय गरामध्ये ५०० पीपीएम ऍस्कॉर्बिक आम्ल व ७०० पीपीएम केएमएम मिसळून तो उणे २० अंश सेल्सिअस तापमानास गोठवून ठेवल्यास एक वर्षापर्यंत चांगला राहतो.
 • गर विविध पदार्थ तयार करण्यासाठी वर्षभर वापरता येतो. गोठविलेल्या सीताफळाच्या गरास स्थानिक तसेच परदेशी बाजारपेठांत चांगली मागणी आहे.

गराची पावडर

 • फळाचा गरामध्ये ५०० पीपीएम ऍस्कॉर्बिक आम्ल व ७०० पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाइट व २ ते ३ टक्के माल्टो डेक्‍स्ट्रीन मिसळून स्प्रे ड्रायरमध्ये किंवा ड्रम ड्रायरमध्ये ५ ते ८ टक्के पाण्याचा अंश येईपर्यंत वाळवावा.
 • यानंतर तयार झालेली पावडर निर्वात केलेल्या पिशवीमध्ये भरून, थंड ठिकाणी साठवून ठेवावी.
 • अशाप्रकारे तयार केलेली पावडर आइस्क्रिम, श्रीखंड, मिल्कशेक, टॉफी इत्यादी पदार्थ तयार करताना वापरता येते.

सीताफळातील गर, बिया वेगळ्या करण्यासाठी यंत्र

 • अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागातील तज्ज्ञांनी पंदेकृवी सीताफळ गर व बीज निष्काजन यंत्र विकसित केले अाहे. या यंत्रामधून काढलेल्या गरामध्ये पाकळ्या अखंड राहत असल्यामुळे गराला चांगला बाजारभाव मिळतो. त्यामुळे सीताफळ बाजारात कमी भावात न विकता त्याचा गर काढून विकल्यामुळे सीताफळाचे चांगले मूल्यवर्धन होते.

यंत्राची वैशिष्ट्ये

 • या यंत्राची गर निष्काजन क्षमता ९२ ते ९६ टक्के अाहे.
 • गरामध्ये ७५ ते ८५ टक्के पाकळ्या राहतात.
 • यंत्राची क्षमता ७० ते ८० किलो प्रतितास अाहे.
 • यंत्र ०.५ अश्वशक्तीच्या सिंगल फेज विद्युत मोटारवर चालते.

गर वेगळा करण्याची प्रक्रिया :

 • पिकलेल्या सीताफळाचे दोन भाग करून साल वेगळी करावी.
 • मोठ्या अाकाराच्या चमच्याने गर बियांसहित यंत्राच्या फिडिंग चाडीमध्ये टाकावा. यंत्राच्या गर व बीज निष्काजन रोलर या प्रमुख यंत्रणेद्वारे गर व बिया वेगळ्या होतात.
 • ब्रश रोलरद्वारे चांगल्या प्रतीच्या पाकळ्यांसहित गर वेगळा केला जातो व तो खालील भागात गर निष्काजन मार्गाने वेगळा केला जातो. तर दंडगोलाकृती चाळण्याद्वारे बिया वेगळ्या केल्या जातात.

यंत्राचे फायदे :

 • हे यंत्र चालवण्यास सुलभ व हाताळण्यास सोपे अाहे. अकुशल किंवा कुशल मजुराकडून हे यंत्र चालविता येते.
 • गर वेगळे करण्याची प्रक्रिया जलद होत असल्याने गर लगेच पॅक करून डीप फ्रीजरमध्ये साठवता येतो. त्यामुळे गराचा रंग बदलत नाही.
 • गर काढण्याच्या प्रक्रियेत मानवी हाताळणी कमी असल्याने गराची प्रत चांगली राहते.
 • अारोग्यास पोषक अशा स्थितीत गर काढला जातो. फळांच्या काढणीपश्चात कमी प्रमाणात नुकसान होते.
 • मोठ्या प्रमाणात मिळालेल्या सीताफळाच्या सालीचा उपयोग सेंद्रिय खतनिर्मितीसाठी करता येतो. तसेच बिया रोप निर्मितीसाठी किंवा अाैषधे तयार करण्यासाठी वापरता येतात.

 

श्रीखंडापासून तयार होणारे उपपदार्थ :-

श्रीखंड

 • सीताफळाचा गर किंवा पावडर वापरून उत्तम प्रतीचे श्रीखंड तयार करता येते. या श्रीखंडास चांगली चव असते.
 • गर १०० ग्रॅम, साखर ५०० ग्रॅम व ४०० ग्रॅम चक्का मिसळून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. त्यामध्ये ड्रायफ्रूट्‌स मिसळून फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यावर त्याचा आस्वाद घ्यावा.

सरबत

 • गर १५ टक्के, साखर १५ टक्के व सायट्रिक आम्ल ०.२५ टक्के घेऊन उत्तम प्रकारे सरबत करता येते. प्रथम गर घेऊन त्यामध्ये प्रमाणात मोजून घेतलेली साखर, सायट्रिक आम्ल व पाणी मिसळून ते चांगले ढवळून घ्यावे. हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळावे. थंड झाल्यावर त्याचा आस्वाद घ्यावा.
 • जर हे सरबत जास्त काळ साठवून ठेवायचे असल्यास ते गरम करून त्यामध्ये १०० पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाइट मिसळून निर्जंतुक केलेल्या २०० मि.ली.च्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून, झाकण लावून ठेवावे. परत पाश्‍चराइज करून, थंड करून, लेबल लावून, थंड ठिकाणी बाटल्या साठवून ठेवाव्यात. तयार सरबत १ ते २ महिने टिकवून ठेवता येते.

जॅम

 • गराच्या वजनाएवढी साखर मिसळून तो गरम करावा. सतत ढवळत राहावे. नंतर यामध्ये २ ते ५ ग्रॅम प्रतिकिलो गर या प्रमाणात सायट्रिक आम्ल मिसळून ते मिश्रण घट्ट होईपर्यंत म्हणजेच तुकडे पडेपर्यंत शिजवावे.
 • या वेळी मिश्रणाचा टीएसएस ६८ ते ६९ टक्के असतो.
 • तयार झालेला जॅम निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून, बाटल्या थंड करून, त्यावर मेणाचा थर देऊन किंवा ॲल्युमिनियम फॉइल लावून, हवाबंद करून झाकण लावावे. बाटल्या थंड आणि कोरड्या जागी साठवाव्यात.

रबडी

 • एक किलो गरामध्ये ९०० मि.ली. दूध आणि १०० ग्रॅम साखर मिसळून चांगले ढवळून गाळून घ्यावे. हे मिश्रण १५ ते २० मिनिटे गरम करावे.थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवून त्याचा आस्वाद घ्यावा.

 

December 4, 2017

0 responses on "Custard Apple Processing Business"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »