शेवग्याचे उत्पादन घेताय, मग हे करा……

शेवग्याचे उत्पादन घेताय, मग हे करा……
शेवग्याच्या झाडास लागवडीनंतर सहा महिन्यानंतर फुले येऊन शेंगा लागण्यास सुरवात होते. शेंगाचा बहर अत्यंत दाट असल्यास फांद्या मोडू नयेत यासाठी झाडांना आधार द्यावा. ठिबक सिंचनाने पिकाच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. मुख्य शेतात शेवग्याच्या रोप लागवडीनंतर शेवग्याच्या झाडाची वाढ झपाट्याने होते. प्रत्येक रोपास आधार द्यावा. लागवडीनंतर दोन महिन्यांनी म्हणजेच ३ ते ३.५ फूट उंच वाढल्यानंतर रोपाचा शेंडा मारावा. शेंडा मारल्यामुळे रोपास अनेक फुटवे येतात. त्यापैकी वरील फुटवे समतोल पद्धतीने ठेवावेत. खालची फूट काढून टाकावी. रोपास ठेवलेली फूट जलद वाढते. त्यांचे झाडात रूपांतर होते. या काळात फांद्याची जास्त वाढ (६ ते ८ महिन्यांनी) झाल्यास परत शेंडा मारावा. त्यानंतर (सहा महिन्यांनंतर) झाडास फुले येऊन शेंगा लागण्यास सुरवात होते. शेंगाचा बहर अत्यंत दाट असल्यास फांद्या मोडू नयेत म्हणून आधार द्यावा. शेंगा काढणीनंतर एप्रिल महिन्यात फांद्याची छाटणी करावी. त्यामुळे प्रत्येक झाडापासून नियमित उत्पादन मिळते. साधारणतः २५ ते ३० टक्के फांद्याची छाटणी करावी. शेवग्यामध्ये फुलधारणा हे नवीन पालवीमध्ये बगलेतून होत असते. म्हणून छाटणी नियमितपणे केल्यास फळधारणा जास्त प्रमाणात होण्यास मदत होते.

झाडांचे व्यवस्थापन : 
१) बागेला पाणी देण्याचे प्रमाण जमिनीच्या मगदूर व हवामान, झाडाचे वय यावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे हिवाळ्यात २० ते २५ दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळ्यात १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
२) ठिबक सिंचन असल्यास झाडाच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करता येते.
३) रोप लागवडीनंतर ५ ते ६ महिन्यांनी फुलोरा येण्यास सुरवात होते.
४) शेवग्यामध्ये अधिक फळधारणा मिळविण्यासाठी प्रति हेक्टरी मधमाशांच्या सहा पेट्या ठेवाव्यात. यामुळे शेंगांच्या उत्पादनामध्ये वाढ होते.
५) दरवर्षी प्रत्येक झाडास मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतर दहा किलो शेणखत, ७५ ग्रॅम नत्र, ७५ ग्रॅम स्फुरद आणि ७५ ग्रॅम पालाश द्यावे. माती परीक्षणानुसार खतमात्रा नियोजन करावे.

दर्जेदार शेंगांसाठी – 
१) लागवडीनंतर ८ ते १० महिन्यांनी शेवग्याच्या शेंगा काढणीस तयार होतात. पूर्ण वाढ आणि ज्यांचा पीळ पूर्ण उलगडला आहे आणि शीरा पूर्ण नाहिशा होण्याच्या अगोदर शेंगांची काढणी करावी.
२) शेंगाची लांबीनुसार प्रतवारी करावी.
३) प्रत्येक झाडापासून सुमारे ३० ते ३५ किलो हिरव्या शेंगा मिळतात.
४) प्रत्येक वर्षी झाडांची व्यवस्थित देखभाल केल्यास झाडाच्या वाढीनुसार चांगले उत्पादन मिळते.
५) बहुवर्गीय जातींची लागवड साधारणपणे आर्थिकदृष्ट्या ८ ते १० वर्षांपर्यंत, तर वार्षिक जातींची लागवड ४ ते ५ वर्षांपर्यंत फायदेशीर ठरते.
जुन्या झाडांचे पुनरुज्जीवन :- 
जेव्हा बहुवर्षीय जातींमध्ये (झाडासारखे वाढणारे) पाच वर्षांनंतर वाढीचा जोम कमी होतो, तेव्हा अशा झाडांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी छाटणी करताना जमिनीपासून साधारण एक मीटरवर मुख्य खोड ठेवावे. त्यानंतर चार फांद्या वाढू द्याव्यात. अशा पद्धतीने पुढे झाडांपासून अधिक उत्पादन घेता येते. फळ काढणीनंतर साधारणपणे हवामान, पाण्याची उपलब्धता पाहून छाटणी करावी.
 
 

March 8, 2017

0 responses on "शेवग्याचे उत्पादन घेताय, मग हे करा……"

    Leave a Message

    Your email address will not be published.

    All Right Reserved.
    Call Now ButtonCall Now
    Translate »