संघर्ष, प्रयत्नावादातून केली यशस्वी शेती

आटपाडी (जि. सांगली) येथील अत्यंत जिद्दीच्या देशमुख कुटुंबाने प्रतिकूलतेत शेतीत केलेले प्रयत्न अनुकरणीय आहेत. डाळिंब, द्राक्ष या नगदी पिकांसह शेळीपालन, पोल्ट्री, चिकन सेंटर आदी विविध वैशिष्ट्यांसह त्यांनी उत्पन्नाचे स्राेत वाढवले. आर्थिक, तांत्रिक अशा आघाड्यांवर चोख व्यवस्थापन करीत एकात्‍मिक शेती पद्धतीचा विस्तार त्यांनी साधला आहे.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्‍यातील शेतकरी द्राक्षशेतीतही कौशल्य अजमावू लागला आहे. त्यापैकीच आटपाडी येथील देशमुख कुटुंब. त्यांची एकूण सतरा एकर शेती आहे. वेगवेगळी वैशिष्ट्ये फुलवत, जिद्दीने त्यांनी एकात्‍मिक पद्धतीने शेती फुलवली आहे.

 

देशमुख यांचे संयुक्त कुटुंब

 • एकूण २० सदस्य
 • पाच भावांचे कुटुंब. पैकी रामकृष्ण व आबासाहेब शेतीत मग्न.
 • बावीस वर्षे देशाची सेवा करून सूर्यकांतही त्यांच्या जोडीने काळ्या आईची सेवा करीत आहेत.
 • बाबासाहेब पुण्यात तर शशिकांत अकलूज येथे राहतात.

संघर्ष, दहा लाखांचं नुकसान

देशमुख बंधूंच्या वडिलांनी नानासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीत शेती कसण्यास सुरवात केली.
दुसऱ्यांच्या शेतातही बैलानं मशागत करायचे. त्यातून प्रपंच चालवायचे. पाणी नसल्याने हंगामी पिकं असायची. सन १९८५ मध्ये लेअर पक्ष्यांचा पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. तो सुरळीत सुरू होता. सन २००६ मध्ये बर्ड फ्लू रोगाने कोंबड्या दगावल्या. त्यात दहा लाख रुपयांचं नुकसान झालं.

चिकाटी सोडली नाही

रामकृष्ण बी. एससी. ‘बायोलॉजी’ पदवीधारक आहेत. नोकरीसाठी त्यांनी प्रयत्न केले. ती मिळाली नसली तरी खचले नाहीत. परिसरात वाढणारी डाळिंबाची शेती पाहून हा प्रयोग करायचं ठरवलं. निर्यातक्षम उत्पादनाला प्रारंभ केला. कृषी प्रदर्शने, मित्र मंडळी, बी. टी. पाटील, राजू पाटील यांची त्यात मदत घेतली.

वडिलांकडून धडे

सन १९८५ साली सुरू केलेल्या पोल्ट्री आणि डाळिंबातून पैसे मिळू लागले. त्यातून सहा एकरांपर्यंत शेती वाढवत नेली. पूरक व्यवसायाची संकल्पना रामकृष्ण यांना वडिलांकडून मिळाली. सन १९९१ मध्ये आटपाडीत भाडेतत्त्वावर ब्रॉयलर कोंबडी व्यवसाय सुरू केला. पण दरात तफावत, वेळेवर पैसे न मिळणे या समस्या सुरू झाल्या. अखेर आटपाडीत स्वतःचेच चिकन सेंटर थाटले. मार्केट कसं मिळवायचं, विक्री कशी वाढवायची याचा अभ्यास केला. सन २००० साली भूविकास बॅंकेच कर्ज घेऊन १२ हजार पक्ष्यांचं शेड उभारलं. मग अकलूज (जि. सोलापूर) येथे दुसरं चिकन सेंटर सुरू केलं. त्याची जबाबदारी शशिकांत यांनी घेतली. त्याठिकाणी कोंबड्या आटपाडी शेडमधूनच पुरवल्या जातात.

पुन्हा नुकसानाचा फेरा

नव्या शेतात २०१० मध्ये ऊस लागवड केली. रामकृष्ण यांचे आजोळ तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी. तालुक्याची द्राक्ष पट्टा अशी ओळख. मामांनी उसापेक्षा द्राक्ष लागवडचा सल्ला दिला.
अनुभवाचा अभाव होता. मग मामांनी अर्थशास्त्र, तंत्र समजावून सांगितले. सन २०११ ला माणिक चमन वाणाची लागवड केली. दोन वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळं बागेचे मोठे नुकसान झाले. यंदा अर्ली छाटणीच्या बागेत तब्बल ३० ते ३५ लाख रुपयांचं मोठं नुकसान झालं. पण त्यातूनही मनोबल कायम ठेवलं.

आठ किलोमीटरवरून पाणी

आटपाडी तालुक्‍यात टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी आले. त्याचा फायदा घेत
२०१४ साली २५ लाख रुपये खर्च करून आठ किलोमीटरवरून पाइपलाइन करून टेंभूचे पाणी शेतात आणले. त्यातून पाण्याची शाश्‍वत सोय केली.

व्यवस्थापनातील ठळक बाबी

शेती

 • डाळिंब- एकरी उत्पादन – १२ ते १४ टन
 • निर्यातक्षम उत्पादनास दर प्रतिकिलो- ८०, ९० ते १०० ते ११० रू.
 • द्राक्ष उत्पादन- १२ ते १५ टन, स्थानिक विक्रीवरच भर
 • दररोज सर्व बंधू एकत्र बसून पुढील कामांची आखणी करतात.
 • प्रत्येकजण स्वतंत्र जबाबदारी उचलतो.

पोल्ट्री

 • सुमारे दोनहजार पक्ष्यांची बॅच
 • आटपाडी व अकलूज या दोन्ही चिकन सेंटरला विक्री
 • व्यापाऱ्यांनाही विक्री- दर- ५० ते ८० रुपये प्रतिकिलो
 • ड्रेसड चिकन दर- १४० ते १६० रुपये किलो
 • कोंबडी खत वर्षाकाठी विक्री- ७० ते ८० टन (प्रतिटन ३५०० रु.)

शेळीपालन

 • चार वर्षांपासून. एकूण ३० शेळ्या (बीटल, जमनापूरी, उस्मानाबादी)
 • आडपाटीतील आठवडा बाजारात चार महिने वयाच्या बोकडाची सातहजार रुपये दराने विक्री

दुग्धोत्पादन

 • चार पंढरपुरी म्हशी
 • सध्याचे दररोजचे संकलन- २० लिटर
 • साधारण सात ते आठ फॅट, डेअरीला मिळणारा दर- ३० ते ४० व कमाल ४५ रुपये प्रतिलिटर
 • सुमारे १० लिटर विक्री, १० लिटर घरच्यासाठी

साभार :अॅग्रोवन

March 17, 2020

0 responses on "संघर्ष, प्रयत्नावादातून केली यशस्वी शेती"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »