*पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली सक्षम*

राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील प्रशांत आणि  गौरी पाटील या शेतकरी दांपत्याने काटेकोर नियोजनातून शेती किफायतशीर केली. संतुलित खत व्यवस्थापन, ऊस रोपनिर्मिती, भाजीपाल्याच्या आंतरपिकातून उत्पादन खर्चात बचत केली. याचबरोबरीने गूळनिर्मिती आणि पशूपालनातून आर्थिक परिस्थितीही सक्षम केली आहे.

*आंतरपिकातून उत्पन्न वाढ*
पाटील दांपत्याने साडेचार एकर बागायती क्षेत्राला ठिबक सिंचन केले आहे. बारमाही पाण्याच्या विहिरी असूनही सुरवातीपासूनच ठिबकचा पर्याय त्यांनी निवडला. गूळ निर्मितीच्यादृष्टीने पाटील यांनी को- ९२००५ या ऊस जातीची लागवड केली आहे. पूर्व हंगामी लागवड केली जाते. चार फुटाची सरी करून उसाच्या मधल्या पट्यात मेथी, वांगी, कोथिंबीर, कोबी, फ्लॉवरचे आंतरपीक घेतले जाते. उसाचे एकरी सरासरी ३५ ते ४० टन उत्पादन निघते. पाटील खोडवा तसेच निडवाही ठेवतात. सर्व ऊस गूळनिर्मितीसाठी वापरला जातो.

*गादीवाफ्यावर ऊस रोपनिर्मिती*
प्रशांत पाटील उसाची लागवड पारंपरिक पद्धतीने न करता रोप पद्धतीने करतात. ट्रे मध्ये रोपे न करता गादीवाफ्यावर एक डोळा कांडी, शेणखत, गांडूळ खताचा वापर करून रोपनिर्मिती केली जाते. या पद्धतीने ट्रे मध्ये रोपे तयार करण्याच्या तुलनेत सत्तर टक्के खर्च कमी येत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

*शेतीतूनच केली प्रगती*
दुधाळ गाईंची संख्या वाढविणे, घर, विहिरीचे नूतनीकरण आणि शेती सुधारणा या सर्व बाबी पाटील दांपत्याने शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून केल्या आहे. काटेकोर शेती व्यवस्थापन आणि दैनंदिन जमाखर्चाच्या नोंदी हे त्यांच्या यशाचे गमक आहे.

*गौरीताईंचा सकारात्मक दृष्टिकोन*
शेती आणि पशूव्यवस्थापनात प्रशांत पाटील यांच्या पत्नी गौरी यांचाही मोठा वाटा आहे.प्रशांत सुधारित तंत्राने शेती करत असल्याने गौरी यांनाही आवडीने शेती व्यवस्थापनात साथ देण्यास सुरवात केली.

 *गुऱ्हाळातून वाढविला नफा*
बाजारपेठेतील चढ उतारामुळे गेल्या काही वर्षांपासून गूळ उत्पादक तोट्यात आहे. पण प्रशांत पाटील यांचा अनुभव वेगळा आहे. पाटील गेली वीस वर्षांपासून कोणत्याही कारखान्याला ऊस न देता गूळ करून कोल्हापूर बाजारपेठेत विकतात. गुणवत्तापूर्ण गुळामुळे त्यांना चांगला दर मिळतो.

  *दुग्ध व्यवसाय केला फायदेशीर*
शेतीला पूरक असणाऱ्या दुग्ध व्यवसायाकडेही पाटील यांनी गांभिर्याने लक्ष दिले आहे. सध्या त्यांच्या मुक्त संचार गोठ्यात पाच होल्स्टिन फ्रिजीयन गाई आहेत.शेणखताचा वापर स्वतःच्या शेतीमध्ये केला जातो. काटेकोर नियोजन केल्याने पशूपालनातूनही चांगला नफा शिल्लक राहातो, असे पाटील सांगतात.

साभार: अग्रोवन 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Customer Care