स्वच्छ दुग्धोत्पादनासाठी आवश्यक बाबी……….!!!!

स्वच्छ दुग्धोत्पादनासाठी आवश्यक बाबी……….!!!!
निरोगी व स्वच्छ गाईच्या कासेतून येणारे दूध हे प्रथमतः स्वच्छ असते. ज्या वेळी त्याचा अस्वच्छ किंवा दूषित वातावरणाशी संबंध येतो, त्या वेळी जंतूंचा शिरकाव होऊन ते लवकर खराब होते. खराब दूध शरीरास व आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असतेच; पण ते जास्त वेळ टिकून राहत नसल्याने त्याची प्रतवारी घसरते आणि मागणीही कमी होते. म्हणूनच स्वच्छ दुग्धोत्पादन ही आवश्यक बाब आहे.
दुधामध्ये प्रमाणापेक्षा जास्त जंतू असल्यास ते दुधाला लवकरात लवकर आंबट बनवितात, कारण दुधातील साखरेमध्ये आम्ल तयार करणारे जंतू कार्यरत असतात. त्यापासून लॅक्टिक आम्ल तयार होते. त्यापासून दुधाला आंबट चव येते. जेवढे जंतू जास्त, तेवढेच आम्लाचे प्रमाण अधिक राहाते. आम्लाचे प्रमाण दुधामध्ये वाढत गेले तर ते दूध लवकरच नासते. म्हणून स्वच्छ, शुद्ध व हानिकारक जंतूविरहित दुधाकरिता दुधाळ जनावरे, त्यांच्या संपर्कात येणारी माणसे, भांडी नेहमी स्वच्छ व निर्जंतुक असावयास हवीत.
                              जिवाणूंच्या संख्येनुसार कच्च्या दुधाचे प्रमाणीकरण
१. दुधाचा प्रकार –  स्टँडर्ड प्लेट काउंट प्रतिग्रॅम.
२. उत्तम किंवा चांगल्या प्रतीचे – २ लाखांपेक्षा कमी.
३. चांगल्या प्रतीचे – २ ते १० लाखांदरम्यान.
४. बरे किंवा मध्यम प्रतीचे –  १० ते ५० लाखांदरम्यान.
५. खराब किंवा हलक्या प्रतीचे –  ५० लाखांपेक्षा जास्त.

स्वच्छ दूध निर्मितीसाठी महत्त्वाचे…
१.  जनावरे स्वच्छ, निरोगी अाणि रोगमुक्त असावीत. सांसर्गिक रोगांचे निदान होण्यासाठी जनावरांची वेळोवेळी पशुवैद्यकामार्फत तपासणी करावी. उदा. टी.बी.
२.  धार काढतेवेळी जनावरासमोर पुरेसे खाद्य द्यावे, जेणेकरून त्याचे लक्ष विचलित होणार नाही.
गोठ्या सभोवतालच्या परिसरात पाणी साठू देऊ नये. डास, माश्या, गोचीड व इतर कीटकांचा वेळोवेळी बंदोबस्त करावा.
३.  दूध काढणारी व्यक्ती निरोगी, निर्व्यसनी असावी. त्याच्या हाताला कोणत्याही प्रकारच्या जखमा नसाव्यात, नखे कापलेली असावीत, कपडे स्वच्छ असावेत आणि दूध काढण्यापूर्वी हात स्वच्छ धुतलेले असावेत.
४. दूध काढण्यापूर्वी शेण, काडीकचरा, मलमूत्र काढून गोठा स्वच्छ करावा.
५. गायीला एक ते दोन वेळा नारळाच्या काथ्याने किंवा हाताने खरारा करावा, त्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते अाणि अंगावरील सुटे केस, केसात अडकलेले शेण निघून जाण्यास मदत होते.
 

६. दूध काढण्यापूर्वी व नंतर जनावरांची कास, सड, मांड्या इत्यादी निर्जंतुक द्रावणाने स्वच्छ करावे.
७. पूर्ण मूठ पद्धतीने धार काढावी, त्यामुळे सडाला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. कासदाह रोग होण्याची शक्यता कमी राहाते. जास्त दूध देणाऱ्या गायीकरिता मशिन पद्धत अवलंबणे योग्य असते.
८. दूध काढल्यानंतर स्वच्छ भांड्यात काढून थंड जागी.(१०० अंश सेल्सिअस) साठवावे, त्यामुळे दुधाची योग्यता चांगली राहते.
९. दूध काढताना जनावराचे मागचे पाय घट्ट बांधावेत, म्हणजे शेपटीच्या हालचालीमुळे दुधात घाण पडणार नाही.
१०. कासदाह आजाराच्या चाचणीकरिता जनावर पान्हावल्यावर प्रत्येक सडातील धारा कपामध्ये काळ्या रांगाच्या काचपट्टीवर घ्याव्यात. दुधाचे निरीक्षण करावे. जर काचपट्टीवर दुधाच्या गुठळ्या दिसल्या, तर असे दूध इतर दुधात मिसळू नये.
११. धार काढताना किंवा त्याआधी किमान दोन ते तीन तास मुरघास देऊ नये. दुभत्या जनावरांना कांदा, कोबी, लसूण इत्यादीचा पाला खाऊ घातल्यास दुधाला तसाच वास येतो.

१२. धार काढताना सडांना तेल किंवा व्हॅसलिन लावल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. दूध काढताना कास नेहमी कोरडी असावी.
१३. गोठ्यात सांडपाणी वाहून जाण्याची सुयोग्य व्यवस्था असावी. शेण- मूत्राचा थर बसला असल्यास तो खरडून गोठा स्वच्छ करावा. गव्हाण, गटारी स्वच्छ असाव्यात.
१४. गोठ्यातील भिंती वर्षातून किमान दोन वेळा चुना लावून रंगवून घ्याव्यात.


दुधातील पाणी, एकूण घनपदार्थ, स्निग्धांश, केसिन, प्रथिने, शर्करा या घटकद्रव्यांवर परिणाम करणाऱ्या बाबी
१.  जनावरांचा प्रकार, जात अाणि वय, दुग्धकाळाचा टप्पा, ऋतुमानानुसार फरक, दूध काढण्याच्या वेळांमधील अंतर, विण्याच्या वेळी असणारी स्थिती, दिले जाणारे खाद्य, इतर बाबी (दूध काढणाऱ्या व्यक्तीत बदल, आजारपण, जनावरांतील माज, औषधोपचार इ.)
२.  दूध साठविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्याच्या धातूचा दुधाचे तापमान, साठवून ठेवण्याचा कालावधी, भांड्यांची स्वच्छता, गुणवत्ता अाणि आम्लतेवर परिणाम होत असतो.

 

दुधाच्या भांड्यांच्या निर्जंतुकीकरणाच्या वेळी घ्यावयाची काळजी.  
१. दुधाची भांडी फुटलेली किंवा तडे गेलेली नसावीत.
२. भांडे पूर्णतः स्वच्छ होत नाही तोपर्यंत त्याचे निर्जंतुकीकरण करावे.
३. भांडी निर्जंतुक करण्यासाठी गरम पाणी व जंतुनाशकाचा वापर करावा.
४. भांड्याच्या पृष्ठभागाला चिकटलेले दूध काळजीपूर्वक स्वच्छ करावे, अन्यथा दूध खराब होते.
५. निर्जंतुकीकरणासाठी सोडिअम कार्बोनेट, सोडिअम हायड्राॅक्साईड, सोडिअम फॉस्फेट या रासायनिक   घटकांचा वापर करता येतो.
 

February 17, 2017

0 responses on "स्वच्छ दुग्धोत्पादनासाठी आवश्यक बाबी..........!!!!"

    Leave a Message

    Your email address will not be published.

    All Right Reserved.
    Call Now ButtonCall Now
    Translate »