दर्जेदार गूळ तयार करायाचा असेल तर हे करा……!!!

दर्जेदार गूळ तयार करायाचा असेल तर हे करा……!!!
ऊस तोडणीनंतर ६ ते १२ तासांच्या आत गाळप करावे. ऊस गाळपासाठी आडव्या तीन लाट्यांचा, स्वच्छतेच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने गिअर बॉक्स असलेल्या चरक्याची निवड करावी. गुऱ्हाळासाठी चरक्याची गाळप क्षमता ६५ ते ७० टक्केपर्यंत असावी, कारण अधिक गाळपामुळे चिपाडे (बगॅस) कमी मिळतात. त्यामुळे जळणाचा प्रश्न तयार होतो.
१) उसाच्या रसात फिनॉलिक द्रव्ये असतात. या द्रव्यांचा लोखंडाशी संबंध आल्यास रासायनिक क्रिया होऊन गर्द निळ्या किंवा काळ्या रंगाची संयुगे तयार होतात. त्याचा गुळाच्या रंगावर विपरित परिणाम होतो. म्हणून स्टेनलेस स्टील चरक्याचा वापर करावा.
२) द्विस्तरीय पद्धतीच्या गाळीतून रस चांगला गाळून फूड ग्रेडचे प्लॅस्टिक किंवा स्टीलच्या नळीतून मंदानात घ्यावा. मंदानातील स्वच्छ रस पंपाच्या सहाय्याने प्लॅस्टिक किंवा स्टीलच्या साठवण हौदात स्थिरीकरणासाठी ठेवावा. त्यानंतर हौदातून स्वच्छ रस नायलॉनच्या गाळणीतून गाळून तो काहिलीत पुढील प्रक्रियेसाठी घ्यावा.
रस प्रक्रियेसाठी काहिल :- 
१) रस उकळण्यासाठी १००० ते १२०० लिटर क्षमतेच्या लोखंडी पत्र्याच्या काहिलीचा वापर करावा.
२) प्रचलित काहिलीची मापे : तळाचा व्यास १०’ ६’’, वरचा व्यास ११’ ७’’, मध्यभागी उंची २४’’, बाजूची उंची २६.५’’, काहिलीच्या बाजूंचा जमिनीशी कोन ६४.५ असावा.
३) काहिलीच्या आतील बाजूने उडदाच्या पिठाचे लाडन करून घ्यावे. शक्य असल्यास स्टेनलेस स्टीलच्या काहिलीचा वापर करावा.
४) रस उकळण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे चिमणी चुलाण वपरावे. चुलाणावरून काहिल उतरण्यासाठी ‘फ्रेम-चाके-रूळ यांचा समावेश असलेली यांत्रिक पद्धत वापरावी.

कोल्हापूर पद्धतीचे चिमणी (चुलान)
 
१) चुलाण – गोलाकार, व्यास १० फूट व ६ इंच, खोली ५ फूट, जळणाचे छिद्र ९ इंच, हवेसाठी छिद्रे ४ इंच (संख्या ८), सोरा २० इंच बाय २२ इंच, सोरा जमिनीखाली १० फुटावर, लांबी ७ ते ८ फूट त्यानंतर ४० ते ४५ अंशाचा कोन करून सोरा चिमणीला जोडला जातो.
२) चुलाण बांधकामाच्या मजबुतीसाठी आणि त्यातील उष्णता टिकण्यासाठी चुलाणाभोवती जाड वाळू आणि पांढरी माती यांच्या मिश्रणाचा जाड थर द्यावा.
३) बांधकामाकरिता साध्या विटांऐवजी फायर ब्रिक्स वापरल्यास चुलाणाचे आयुष्य आणि कार्यक्षमता वाढते.
४) चिमणी – चुलाणाची कार्यक्षमता अवलंबून असल्याने चिमणीची उभारणी व्यवस्थित करावी. चिनीचता आकार गोल अथवा चौकोनी, तळाचा आतील व्यास ६ फूट, तोंडाकडील व्यास ३ फूट, उंची १६ फूट ठेवावी.

रस उकळणे आणि मळी काढणे :-
१) चुलाण पेटवून रस तापत ठेवावा. मळी व्यवस्थित काढण्यासाठी चुन्याचे द्रावण (१५० ते २०० ग्रॅम चुना ५ लिटर पाण्यात मिसळणे) रसात मिसळावे.
२) तप्त रसातील मळी संपूर्णतः निघण्यासाठी प्रति १००० लिटर रसासाठी दोन किलो भेंडीच्या रोपांचा ठेचा करून १५ लिटर पाण्यात कुस्करून त्याचा अर्क गाळून घ्यावा. तो अर्क काहिलीतील द्रावणात मिसळावा.
३) रसाचे तापमान ८५ अंश सेल्सिअस झाल्यावर म्हणजे २५ ते ३० मिनिटांनी ढोरमळी काढण्याचे काम करावे.
४) ढोरमळी काढल्यानंतर फॉस्फरीक आम्ल (आर्सेनिकमुक्त) १५० ते २०० मि.लि. प्रति १००० लिटर रस याप्रमाणात वापरावे. रसातील अधिक नत्र तसेच रसात मिसळलेल्या चुन्याच्या निवळीचा गुळाच्या रंगावर विपरित परिणाम टाळण्यासाठी फॉस्फरीक आम्लाचा उपयोग होतो.

अपायकारक रसायनांचा वापर टाळा :-
१) बाजारात मिळणारा दर हा गुळाच्या रंगावर अवलंबून असतो. त्यामुळे काही शेतकरी गुळाला गडद पिवळा रंग येण्यासाठी सोडियम हायड्रोसल्फाईड या सारख्या रासायनिक पदार्थांचा वापर करतात. हे रासायनिक पदार्थ मानवी आरोग्यास हानीकारक आहेत. या रासायनिक पदार्थांच्या वापरामुळे गुळातील गंधकाचे प्रमाण वाढते.
२) अन्न भेसळ कायद्यानुसार गुळामध्ये सल्फर डाय ऑक्साईडचे प्रमाण ७० भाग प्रति दशलक्ष (पीपीएम) यापुढे असू नये.
३) सोडियम हायड्रोसल्फाईडच्या अतिवापराने सोडिअमचे प्रमाण वाढते. त्यामुळे हवेतील बाष्प गुळात शोषले जाऊन हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढताच गुळास पाणी सुटते. त्यात बुरशीची वाढ होते. असा गूळ खाण्याच्या दृष्टा हानीकारक ठरतो.त्यामुळे शिफारस नसलेले रासायनिक घटक वापरू नयेत.

दर्जेदार गूळ तयार करण्याची प्रक्रिया :-
१) काहिलीतील रस जोरात उकळू लागल्यानंतर पाकाचे तापमान १०१ ते १०२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आल्यानंतर पाकाचे बुडबुडे होऊन पाक ऊतू जाऊ लागतो. यावेळी जाळावर नियंत्रण ठेवावे.
२) रस ऊतू जाऊ नये म्हणून लाकडी अथवा स्टेनलेस स्टीलचा रहाट काहिलीच्या काठावर बसवून फिरवावा. यामुळे पाकातील पाण्याची वाफ जोरात बाहेर पडते. पाक घट्ट होऊ लागतो.
३) पाकाचे तापमान १०३.५ ते १०५ अंश सेल्सिअस झाल्यानंतर काकवी तयार होेते. काकवीच्या स्थितीनंतर रस ऊतू जाण्याची क्रिया पूर्ण होवून पाक व्यवस्थित उकळू लागतो. त्या वेळी एक हजार लिटर रसासाठी २०० मि.लि. शेंगदाणा तेल काहिलीत मिसळावे. यामुळे पाकाचे तापमान वाढण्यास मदत होते. पाक करपत नाही. पाकाचे तापमान मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक थर्मामीटरचा वापर करावा.
४) पाकाचे तापमान ११८+ ०.५ अंश सेल्सिअस आले असता काहिल चुलाणावरून उतरावी. वाफ्यात गूळ ओतावा. इलेक्ट्रॉनिक थर्मामिटर उपलब्ध नसल्यास गूळ तयार झाला आहे, हे पाहण्यासाठी पाकाची गोळी चाचणी घ्यावी. गोळी चाचणी योग्य आल्यानंतर काहिल लगेच चुलाणावरून उचलून बाजूला घेऊन वाफ्यात ओतावी.
५) वाफ्यामध्ये पाक थंड होत असताना घोटण्याची क्रिया सावकाश करावी. घोटणी जास्त झाल्यास गूळ मऊ बनतो. गुळास रवाळपणा येत नाही. पाकाचे तापमान ७६ अंश सेल्सिअस इतके खाली येण्यापूर्वी साच्यात गूळ ओतून ढेपा तयार कराव्यात.
६) बाजारपेठेत चौकोनी वड्या, मोदकाला मागणी आहे. त्यासाठी २५०ग्रॅम, ५०० ग्रॅम वड्या तसेच ५० ते ६० ग्रॅम वजनाचे मोदक तयार करावेत. यामुळे दर चांगला मिळतो.

गूळ पावडर प्रक्रिया :-
१) गुळापासून तयार केलेल्या पावडरचा रंग विशिष्ट गुणधर्मामुळे गुळापेक्षा अधिक उठावदार असतो. गूळ पावडरमध्ये ओलाव्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे साठवण क्षमता चांगली असते.
२) गूळ खाण्यासाठी वापर करताना रवे (ढेपा) फोडणे, खडे बारीक करणे या गोष्टी कराव्या लागतात. त्यापेक्षा दैनंदिन वापरात गूळ पावडरचा वापर करणे सोयीचे आहे.
३) गूळ पावडर तयार करण्यासाठी गूळ साच्यात न भरता वाफ्यातच थंड होऊ द्यावा. गूळ वाफ्यात घट्ट होण्यापूर्वीच उभ्या-आडव्या रेघामारून गूळ हालवून घेऊन लहान तुकडे करावेत. हे तुकडे वाफ्यात घट्ट झाल्यानंतर सूर्यप्रकाशात कापडाच्या आवरणाखाली ठेवून वाळवावेत.
४) वाळवलेला गूळ लाकडी हातोड्याने फोडून बारीक करावा. ग्राहकांच्या पसंतीनुसार बारीक केलेला गूळ १ मि.मी., २ मि.मी. आणि ३ मि.मी. आकाराच्या चाळणीतून चाळून घेऊन दोन-तीन दिवस उन्हात वाळवून त्यातील आर्द्रतेचे प्रमाण कमी करावे.
५) मोठ्या प्रमाणात गुळाची पावडर तयार करण्यासाठी वाफ्यातील गुळाचे खडे ट्रे ड्रायरमध्ये योग्य तापमानाला वाळवून यांत्रिकी पद्धतीने बारीक करून पावडर तयार करावी.
६) पावडरच्या वर्गवारीनुसार ३०० गेज जाडीच्या पॉलिथीनच्या आकर्षक पिशव्यांतून पॅकिंग करून विक्री करावी.
७) पॉलिपॅक केलेली गूळ पावडर, प्रतीवर कोणताही परिणाम न होता, दोन-तीन वर्ष चांगल्या स्थितीत राहते.

गूळ साठवणूक करताना :-
१) गुळाची मागणी वर्षभर असल्याने उत्पादित गुळापैकी ५० ते ६० टक्के गुळाची मोठ्या कालावधीकरिता साठवण करावी लागते. पावसाळ्यातील चार महिने गूळ साठवणुकीच्या दृष्टीने सर्वांत कठीण काळ असतो.
२) गुळातील ग्लुकोज, फ्रुक्टोज तसेच सोडिअम क्षार हवेतील आर्द्रता शोषून घेतात. त्यामुळे गुळातील पाण्याचे प्रमाण वाढते. अनुकूल आर्द्रता आणि तापमानामुळे सूक्ष्म जिवाणूंची गुळावर वाढ होते. साखरेचे विघटन होवून ग्लुकोजचे प्रमाण वाढून हवेतील ओलावा अधिक प्रमाणात शोषला जातो. गूळ आम्लरुपी बनून बुरशी वाढून गूळ खराब होतो.
३) गुळाची साठवणूक करण्यासाठी उसाची चांगली वाळलेली चोयटी जमिनीवर एकसारखी पसरून त्यावर साधारणपणे २ ते ३ थरांपर्यंतच वाळविलेल्या गुळाच्या ढेपा ठेवाव्यात. प्रत्येक थरावर ३ इंच जाडीचा वाळलेल्या चोयटीचा थर द्यावा. त्यामुळे ढेपा एकमेकांवर घासत नाहीत. ढेपांच्या कडा तुटत नाहीत. गूळ ढेपांवर गोणपाट झाकावे.
४) घरातील वापरासाठी गूळ साठवायचा असल्यास असा गूळ लहान तुकडे करून उन्हामध्येच चांगलावाळवून घ्यावा. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हवाबंद डब्यात, लाकडी पेटीत अथवा लोखंडी कोठीत ठेवावा.
५) गूळ ढेपा वाळवून ५० गेजच्या पॉलिथीन पिशव्यांमध्ये सिलबंद करून बंद खोलीत ठेवाव्यात.

साठवणुकीत गूळ खराब होऊ नये, यासाठी घ्यावयाची काळजी :-
१) आम्ल, चोपण, खारवट जमिनीतील उसापासून तयार केलेला गूळ साठवणुकीसाठी वापरू नये.
२) गूळ तयार करण्यासाठी लवकर व मध्यम पक्व होणाऱ्या जातींची लागवड करावी. कारण उशिरा पक्व होणाऱ्या ऊस जातीपासून तयार केलेल्या गुळात ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते.
३) गुळासाठी शिफारस केल्याप्रमाणे नत्रयुक्त खते उसाला द्यावीत. भरणीनंतर रासायनिक खते देऊ नयेत.
४) खोडवा ऊसापासून गूळ तयार केल्यास साठवणुकीमध्ये चांगला राहतो.
५) जानेवारी ते मार्च या कालावधीत तयार केलेला गूळ साठवणुकीमध्ये चांगला टिकतो.
६) तोडणीनंतर उसाचे गाळप ६ ते १२ तासाच्या आत करावे. रस काढल्यानंतर लगेच गूळ तयार करावा.
७) अपक्व, जास्त वयाचा, लोळलेला, कीड, रोगग्रस्त, पांगशा फुटलेल्या उसापासून तयार केलेला गूळ साठवणुकीसाठी ठेवू नये.
८) गूळ प्रक्रिया करताना रसामध्ये घाण जाऊ नये म्हणून गुऱ्हाळघरात स्वच्छता ठेवावी. रस मंदान तसेच साठवण टाकीवर झाकण ठेवावे.
९) गूळ प्रक्रियेमध्ये रसातील घाण, कचरा, राखेचे कण किंवा मळीचे कण व्यवस्थित काढावेत.
१०) गूळ तयार करताना अनावश्यक रसायनांचा वापर टाळावा.
 

February 28, 2017

1 responses on "दर्जेदार गूळ तयार करायाचा असेल तर हे करा……!!!"

  1. Hi… add me on wats up..

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »