मुरमाड जमिनीवरही फुलवलं नंदनवन, लातूरच्या शेतकऱ्याची यशोगाथा

कष्ट करण्याची तयारी असेल तर मुरमाड जमिनीवरही नंदनवन फुलवू शकतो, हे  लातूरच्या तळनीमधील शेतकऱ्याने* दाखवून दिलं आहे. अण्णाराव पवार असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

 अण्णांकडे गावातील माळरानावर काही वडिलोपार्जित जमिन होती. काही दिवसांपूर्वी जमिनीची वाटणी झाली. अण्णांच्या वाट्याला 12 एकर खडकाळ आणि मुरमाड जमीन आली. पण तरीही अण्णा निराश झाले नाहीत. या जमिनीकडं सकारात्मक दृष्टीनं पाहीलं आणि या जमिनीत भाजीपाल्याची लागवड करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यासाठी मुरमाड जमिनीत काळी माती टाकली. शेताला पाणी देण्यासाठी बोरवेल घेतला आणि सुरु झाली तयारी भाजीपाला शेतीची.

 पाण्याचं नियोजन करण्यासाठी ठिबकचा आधार घेतला. प्रयोग म्हणून टोमॅटो पिकाची लागवड केली. तसंच उरलेल्या शेतात वांगी आणि बटाटाही लावला.

पहिल्याच वर्षी यातून चांगलं उत्पादन मिळालं. त्यामुळे अण्णांचा विश्वास वाढला. त्यानंतर अण्णांनी संपूर्ण शेतात टोमॅटो, भेंडी, दोडका, कारली, फुलकोबी, पत्ताकोबी, शिमला मिरची, वांगी आणि बटाटा या पिकांची लागवड केली.

आतापर्यंत अण्णारावांना भाजीपाल्यातून 11 ते 12 लाखांचं उत्पादन मिळालं आहे. तर आता बटाटा काढणीला आला आहे. यंदा बटट्याचं दीडशे क्विंटल उत्पादन होईल अशी आशा त्यांना आहे. भाजीपाल्यातून अण्णांना अजून 11 लाख मिळण्याची अपेक्षा आहे.


पदरात खडकाळ आणि मुरमाड जमीन पडली असतानाही अण्णाराव खचले नाहीत. नशिबाला दोष दिला नाही. आज मुरमाड जमिनीतून ते लाखांचं उत्पन्न घेत आहेत. त्यामुळं कितीही बिकट परिस्थिती आली तरी शेतकऱ्यानं धीर धरावा. सतत लढत राहवं, म्हणजे यश नक्की मिळतं हेच अण्णारावांनी सिध्द केलं आहे.

 

साभार- ABP माझा 

 

March 17, 2020

0 responses on "मुरमाड जमिनीवरही फुलवलं नंदनवन, लातूरच्या शेतकऱ्याची यशोगाथा"

    Leave a Message

    Your email address will not be published.

    All Right Reserved.
    Call Now ButtonCall Now
    Translate »