
शेततळ्यातील मत्स्यसंवर्धन साठी आवश्यक बाबी – Farm Fisheries
शेततळ्यातील माशांचे उत्पादन अधिक प्रमाणात मिळविण्यासाठी सुधारित मत्स्यसंवर्धन पद्धतीचा अवलंब करावा. तळ्यामध्ये माशांसाठी चांगली खाद्यनिर्मिती होण्यासाठी खतांचा वापर, पूरक खाद्य व्यवस्थापन आणि माशांच्या संरक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे.
शेततळ्यामध्ये प्रामुख्याने रोहू, कटला, मृगळ, देशी मागूर, मरळ, तीलापिया, पंकज इ. माशांचे संवर्धन केले जाते.
- तलावामध्ये मत्स्यबीज सकाळी लवकर अथवा संध्याकाळी उशिरा सोडावे.
- तळ्यातील संवर्धनयुक्त मासे जसे की कटला, रोहू, मृगळ, कोंबडा, चंदेरा, गवत्या यांचा संवर्धन कालावधी सर्वसाधारणपणे एका वर्षाचा असतो.
- देशी मागूर या जातीच्या माशांचा संवर्धन कालावधी ५ ते ६ महिन्यांचा
- असतो. मरळ, पंकज, तिलापिया या जातीच्या माशांच्या विक्रीयोग्य वाढीचा सर्वसाधारण कालावधी ७ ते ८ महिन्यांचा असतो.
- मत्स्यसंवर्धन करताना योग्य जागेची निवड करणे आवश्यक असते.
मत्स्यबीजापेक्षा मत्स्य बोटुकली फायदेशीर
- मत्स्यबीजापेक्षा तळ्यामध्ये मत्स्य बोटुकली सोडणे अधिक फायदेशीर ठरू शकते. बोटुकलीचा आकार मोठा असल्यामुळे त्यांच्या वाढीसाठी कालावधी कमी लागतो.
- मत्स्य बोटुकली इतर भक्षक माशांना कमी प्रमाणात बळी पडतात.
- मरतुकीचे प्रमाण कमी असते, त्यामुळे तळ्यातील उत्पादनवाढीस मदत मिळते.
- मत्स्य बोटुकली आकाराने मोठ्या असल्यामुळे बोटुकली नेमक्या हव्या त्याच प्रजातीच्या आहेत किंवा नाही हे ओळखणे सोपे जाते. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी असते.
- बोटुकली संवर्धन केल्यानंतर मासे जातीप्रमाणे साधारण ८ ते १० महिन्यांत विक्री योग्य होतात, त्यामुळे तळ्यात बारमाही पाणी असणे गरजेचे नसते.
- आकार मोठा असल्यामुळे बोटुकली कृत्रिम खाद्यास चांगला प्रतिसाद देतात.
- साधारणपणे तळ्यामध्ये संवर्धनासाठी बोटुकलीचा आकार ५० ते १०० मि.मी. एवढा असावा.
- तळ्यामध्ये बोटुकलीची संचयन घनता योग्य असावी. जास्त संख्येमुळे माशांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतात.
तळ्याचे व्यवस्थापन
- तळ्यामध्ये मत्स्यबीज संवर्धनापूर्वी चुना मारून घ्यावा. चुन्यामुळे तलावाच्या तळाशी साठलेले विषारी वायू नाहीसे होतात. आम्लाचा निर्देशांक वाढून तो स्थिर राहण्यास मदत होते.
- तळ्यातील पाण्यात असणारे अतिरिक्त जैविक घटक चुन्यामुळे मोकळे झाल्यामुळे वनस्पती व प्राणी प्लवंगाची वाढ योग्य प्रमाणात होते, तसेच मत्स्य बीजामध्ये रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होते.
- एक हेक्टर क्षेत्राला २५० किलो या प्रमाणात तळभागावर चुना मारून घ्यावा किंवा चुना तळ्याच्या पाण्यात मिसळावा.
- शेततळ्यात हेक्टरी १००० किलो शेणखत, युरिया हेक्टरी ५० किलो, फॉस्फेट हेक्टरी ५० किलो या प्रमाणात खते वापरावीत.
- संवर्धन तलावात एकाच वेळी दोन ते तीन खते वापरली जाऊ शकतात.
- मत्स्यसंवर्धन करताना तलावातील पाण्याच्या रंगाबाबत माहिती असणे आवश्यक बाब आहे. तलावातील पाणी स्वच्छ असू नये. संवर्धन तलावात जमिनीचा तळ दिसत असेल तर माशांच्या आहारातील मुख्य घटक असलेल्या प्लवंगाची उत्पत्ती पाण्यात कमी आहे असे समजावे. मातीसारखा किंवा चहासारखा रंग पाण्यातील मातीच्या सूक्ष्म कणांची उपस्थिती दर्शवितो, जे मत्स्यसंवर्धनासाठी पोषक नसते. पाण्याचा हिरवा रंग वनस्पती प्लवंग दर्शवितो. पाण्याचा बदामी किंवा तपकिरी रंग प्राणी प्लवंग दर्शवितो अशा पाण्यात माशांची वाढ जलद गतीने होते.
- मत्स्य तळ्यात सुरवातीला क्षेत्रफळानुसार खते वापरून झाल्यानंतर पाण्यामध्ये वनस्पती व प्राणी प्लवंग तयार व्हायला सुरवात होते. खते मारून झाल्यानंतर सुरवातीला सर्वसाधारणपणे १५ दिवसांनंतर तळ्यात बोटुकली सोडावीत.
- माशांच्या योग्य वाढीसाठी मत्स्यसंवर्धन तलावात प्राणवायूचे प्रमाण ५ ते १० मिलिग्रॅम/ लिटर एवढे असावे.
शेततळ्यातील मत्स्यसंवर्धन साठी खाद्य व्यवस्थापन
- माशांना जेवढे खाद्य खायला लागेल, तेवढेच खाद्य पुरवावे. अतिखाद्य अथवा कमी खाद्य माशांना पुरविल्यास त्याचे विपरीत परिणाम होतात.
- पूरक खाद्याचे प्रमाण तलावातील माशांचे एकूण वजन व त्यांच्या वाढीच्या अवस्था यावर अवलंबून असते.
- कटला, रोहू, मृगळ या भारतीय प्रमुख कार्प माशांना खाद्य म्हणून सरकी पेंड, शेंगदाणा पेंड, सोयाबीन पेंड द्यावी. इतर माशांचे खाद्य जाती- जातीप्रमाणे त्यांच्या खाद्य खाण्याच्या सवयीनुसार वेगवेगळे असते.
- खाद्य देण्यासाठी तलावामध्ये बांबू रोवून त्या बांबूला प्लॅस्टिकच्या पिशवीला छिद्र पाडून त्यामध्ये आवश्यक तेवढे खाद्य भरावे, जेणेकरून मासे पाहिजे तेवढे खाद्य खातील. त्यामुळे होणारे प्रदूषण देखील टाळता येते.
चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.
शेततळ्यातील मत्स्यसंवर्धन साठी उपाययोजना
- पक्ष्यांपासून माशांचे संरक्षण करण्यासाठी तळ्याच्या वर पक्षिप्रतिबंधक जाळे बसवून घ्यावे.
- माशांमधील रोगाचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी फिश डिसीज डायग्नॉसिस किट उपलब्ध आहेत. हे किट तळ्यावर ठेवून मशांमधील रोगाचा प्रादुर्भाव ओळखता येतो.
- मत्स्यबीज खरेदी करतेवेळी बीज रोगमुक्त असणे आवश्यक असते, त्यावर पुढील मत्स्यशेती व्यवस्थापन बरेच अवलंबून असते.
- माशांच्या योग्य वाढीसाठी संवर्धन कालावधीत मधून- मधून तळ्यात जीवनसत्त्वे आणि खनिजयुक्त खाद्य घटक सोडावेत.
- संहारक आणि मत्स्य भक्षक माशांच्या निर्मूलनासाठी तळ्यात वारंवार जाळी फिरवून स्थानिक व संहारक जातीचे मासे काढून टाकावेत.
- नवीन पाणी तळ्यात घेताना तलावाच्या आतल्या बाजूला बारीक जाळी बसवावी. काही रसायनांचा वापर करून देखील संहारक आणि मत्स्य भक्षक माश्यांचे निर्मूलन करता येते.
- सौजन्य-अँग्रोवनStay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971
0 responses on "शेततळ्यातील मत्स्यसंवर्धन साठी आवश्यक बाबी"