उद्योगासाठी भांडवल उभारणी

 

“कल्पना सत्यात उतरविण्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा”

          उद्योग उभारणी करताना उद्योजकाला ज्या सर्वांत मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागते ते आव्हान म्हणजे उद्योगासाठी भांडवल उभे करणे होय. कोणताही उद्योग सुरू करताना खंड, श्रम व भांडवल (Land, Labor and Capital) या उत्पादन घटकांचा (Factors of Production) प्रामुख्याने विचार करावा लागतो. कारण कोणताही उद्योग हा तीन घटकांच्या योग्य व्यवस्थापनाने अस्तित्वात येत असतो. या उत्पादन घटकांपैकी एक घटक भांडवल ज्याला आपण आपल्या उद्योगाचा प्राणवायू म्हणू शकतो. ज्याच्या अस्तित्वाशिवाय आपला उद्योग तग धरू शकत नाही.

          उद्योगातील विभिन्न कामांची विभागणी व भांडवलाचे व्यवस्थापन हे उद्योग उभारण्याच्या कार्यातील एक अभिन्न अंग आहे. भांडवलाचे नियोजन म्हणजेच थोडक्यात आर्थिक व्यवस्थापन आहे. आर्थिक व्यवस्थापन करणे म्हणजे आपल्या उद्योगासाठी लागणाऱ्या पैशांचे नियोजन करून पैशांची विभागणी उद्योगाच्या आर्थिक ताळेबंदानुसार करणे होय. आर्थिक नियोजन, भांडवल व्यवस्थापन या सर्व गोष्टी महत्त्वपूर्ण आहेतच परंतू मुळात भांडवल उभारणी करताना उद्योजकांसमोर असणाऱ्या एकंदरीत पर्यायांची चर्चा करणे क्रमप्राप्त ठरते.

         उद्योग सुरू करण्यासाठी भांडवल उभे करताना उद्योजकासमोर जो सर्वांत पहिला व सोपा पर्याय उपलब्ध असतो तो म्हणजे बँकेकडील कर्ज. बँकेकडून घेतले जाणारे कर्ज हे भांडवल उभारणीसाठीच्या पर्यायांपैकी सर्वांत सुरक्षित पर्याय समजला जातो. कारण बँकेचे व्यवहार हे पारदर्शी असतात व त्याठिकाणी फसवणूक होण्याची शक्यता कमी असते. मात्र त्यासाठी तुम्हाला बँकेच्या सर्व अटी व नियमांची पूर्तता करावी लागते.

  •  खाजगी कर्ज

         भांडवल उभारणी करताना दूसरा पर्याय जो अवलंबला जातो तो म्हणजे मित्र, नातेवाईक इत्यादींकडून घेतले जाणारे आर्थिक पाठबळ. याठिकाणी कर्ज घेताना तुम्ही तुमच्या मित्र, नातेवाईक यांना भागीदारीचा पर्याय सुचवू शकता. जेणेकरून उद्योगातील जोखीम, भांडवल व जबाबदारी विभाजित होतील. परंतु हा पर्याय सर्वस्वी ज्या व्यक्तीकडून तुम्ही उद्योगासाठी पैसे घेणार आहात त्या व्यक्तीच्या आर्थिक क्षमतेवर अवलंबून आहे. त्यानंतर उद्योजक भांडवल उभारणीसाठी खाजगी व्यक्ति व संस्थात्मक कर्जाचाही विचार करू शकतात. या पर्यायचा विचार करताना मात्र व्यवहारातील पारदर्शकता व सुरक्षितता या गोष्टी पाहणे अनिवार्य ठरते. हे कर्ज घेताना व्याजाचा दर देखील अधिक असतो.

  •  सरकारी योजना

           सरकारी योजना भांडवल उभारणीसाठी एक महत्वाचा पर्याय आहेत.

१. छोट्या उद्योगांसाठी स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक राज्यातील जिल्हास्तरावर जिल्हा उद्योग केंद्र (District Industries Centre) कार्यालय असते. जिथे तुम्हाला सरकारी योजनांची माहिती मिळेल किंवा तुम्ही www.di.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर भेट देऊन माहिती घेऊ शकता.

२. सुशिक्षित बेरोजगार युवकांना उद्योग व व्यापारसेवा उपक्रमात रोजगार मिळावा यासाठी ‘सुधारित बीज भांडवल योजना’ ही योजना आहे. या योजनेबद्दल अधिक माहिती www.bachatgat.gov.in या संकेतस्थळावर मिळेल.

३. पंतरप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत खादी ग्रामोद्योग मंडळाद्वारे अनेक योजना नव उद्योजकांना प्रेरित करण्यासाठी व भांडवल उभारणीसाठी अर्थसहाय्य करण्यासाठी राबविल्या जातात. या योजनांची माहिती www.kvic.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

४. या योजनांव्यतिरिक्त MSME Business loan, Credit Guarantee Fund Scheme for Micro and Small Enterprises (CGFSMSE)  या कर्ज योजना उद्योजकांना वेगवेगळ्या उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देतात. या किंवा कोणत्याही कर्ज योजनविषयी माहिती तुम्हाला www.startupind.gov.in या संकेतस्थळावर मिळेल.

५. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठीच्या सर्व योजनांची माहिती https://msme.gov.in या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर जाणून घेता येईल. त्याचप्रमाणे मुद्रा योजनेची माहिती www.mudra.org.in या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर मिळेल.

“व्यावसायिक ज्ञानाचा पाया भक्कम करा आणि स्वतःचा विकास घडवा.”

Share this:
November 5, 2020

0 responses on "उद्योगासाठी भांडवल उभारणी"

    Leave a Message

    Your email address will not be published. Required fields are marked *

    All Right Reserved.
    Translate »